श्री मारुती स्तोत्र (भीमरूपी महारुद्रा)
समर्थ रामदास स्वामी विरचित अत्यंत प्रभावशाली स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना || १ || महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका || २ || दीनानाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना || ३ || लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका || ४ || ध्वजांगें उचली बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नि काळरुद्राग्नि, देखतां कांपती भयें || ५ || ब्रह्मांडें माइली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भृकुटी ताठिल्या बळें || ६ || पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं | सुवर्णकटिकांसोटी, घंटा किंकिणि नागरा || ७ || ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी || ८ || कोटिच्या कोटि उड्डाणें, झेंपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें || ९ || आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे || १० || अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा, होत जातसे | तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें || ११ || ब्रह्मांडाहोंवते वेढे, वज्रपुच्छें करूं शके | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडीं पाहतां नसे || १२ || आरक्त देखिलें डोळां, ग्रासिलें सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा || १३ || धनधान्य पशुवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रुपविद्यादि, स्तोत्रपाठेंकरूनियां || १४ || भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तही | नासती तुटती चिंता, आनंदें भीमदर्शनें || १५ || हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली भली | दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें || १६ || रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती || १७ ||
स्तोत्राचा थोडक्यात अर्थ
हे स्तोत्र शक्ती आणि भक्तीचा संगम आहे. मारुतीरायाचे 'भीमरूप' आपल्यातील भीती नष्ट करते, तर 'रामदूत' रूप आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवते. या स्तोत्राच्या नियमित पठणाने शारीरिक व्याधी दूर होतात आणि मनाला उभारी मिळते.